"राजू...." अशी आई तिची हाक ऐकताच राजू समजलं, आईचं काहीतरी काम आहे.
आई कुठल्या वेळी अशी हाक मारते? हे राजूला नक्की माहीत होते.
राजूला खेळायला जायचे होते परंतु आईमुळे आता खेळणे बंद झाले. राजूला पाहताच आई म्हणाली,
"अरे राजू, जरा दुकानात जाऊन या यादीतील सामान घेऊन ये."
#Ayushyache-ganit-katha
राजूला आईने पैसे व पिशवी दिली. राजू दुकानाकडे निघाला. दुकानदाराकडून सामान घेतले. दुकानदाराला पैसे दिले. दुकानदाराने पटापट हिशेब करत उरलेले पैसे परत दिले. उरलेले पैसे राजूने खिशात कोंबले. घरात आला पिशवी ठेवली. आईला पैशाचा हिशोब देण्यासाठी राजू स्वतः हिशोब करू लागला. रकमेची आकडेमोड करतांना त्याचे डोळे चमकले. कारण कागदावरती लिहिलेली रक्कम व हिशेब जुळत नव्हता. त्याने खिशातील पैसे भराभर मोजले. तेव्हा त्याच्या लक्षात आले की दुकानदाराकडून चाळीस रुपये राजुला जास्त मिळाले होते. राजूने हळूच पाहिले, आईचे लक्ष नव्हते. राजूने थरथरत्या हाताने वीस रुपयाच्या दोन नोटा त्यांच्या खिशात ठेवल्या व उरलेली रक्कम व हिशोब आईला समजावून दिला. आईने उरलेले पैसे मोजून घेतले. आईची नजर चुकवत राजू म्हणाला,
"आई, मी खेळायला जातो."
राजूचे मित्र खेळण्यासाठी वाटच पाहत होते. सर्वजण खेळात रमले पण राजूचे मन खेळात रमेना. राजू घरी परतला. आई राजूची वाटच पाहत होती.
"चल, हातपाय धुऊन घे. जेवायला बसुया."
#Ayushyache-ganit-katha
राजू जेवणाला बसला. एक घास घेतला, तेवढ्यात आई म्हणाली, "अरे, तू सकाळी तांदूळ आणला ना, त्या आणलेल्या तांदळाचा हा भात आहे. कसा आहे हा तांदूळ?" राजू अस्वस्थ झाला. त्याचा घास तोंडात फिरू लागला. तो पाणी प्यायला.
आई:- "अरे, मगाशी दुकानातला माणूस घरी येऊन गेला." आईचे हे बोलणे ऐकून राजूला भीती वाटू लागली. त्याचे पाय लटपटू लागले. त्याला त्या खिशातील नोटा टोचू लागल्या.
आई पुढे म्हणाली, "तो माणूस म्हणाला की, सकाळी दुकानात खूप गर्दी होती. त्या गर्दीत थोडासा घोटाळा झाला. थोडी गडबड झाली. मग त्याच्या लक्षात आलं आणि त्याला....."
राजूला पुढे ऐकणं असह्य वाटू लागले. राजूच्या मनात वाटू लागले की आईला सर्व खरे सांगावे. खिशातील ते चाळीस रुपये काढून आईच्या हातात ठेवावे.
पण तो काही बोलू शकला नाही.
आई पुढे म्हणाली, "त्या सकाळच्या गडबडीत त्यांने तुला तांदूळ दिलेच नव्हते. थोड्या वेळाने मी पुडे उघडले तेव्हाच समजले होते. मी तुला हाक मारणार होती. इतक्यात तो आला आणि त्याने तो सर्व घोटाळा समजून दिला व अन तो तांदूळ देऊन गेला."
राजूचा जीव भांड्यात पडला. तो कसाबसा चेहरा करून हसला. राजूच्या मनात चलबिचल वाढू लागली.
आईची नजर चुकवून त्यांने गोष्टींचे पुस्तक वाचायला घेतले. पण त्याचे लक्ष लागेना. त्याने पुस्तक बाजूला ठेवले. राजूला हा त्रास असह्य होत होता. राजू आईकडे चोर नजरेने पाहत होता. आईने मोठ्या काबाडकष्टाने राजूला लहानाचे मोठे केले होते. राजूचे वडील लहानपणीच वारले होते . राजू लहानपणापासून आईचे कष्ट पाहत होता. राजूला शिकवण्यासाठी ती स्वाभिमानाने काम करून घर चालवत होते. राजूला या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या. राजूच्या डोळ्यात पाणी आले. हे पाहून आई म्हणाली," ये राजा, काय झाले? तू असं का रडतो? काय झालं? मला खरं सांग."
राजूचे हात नकळत खिशावर गेले. राजू ताडकन जागेवर उठला आणि आईला मिठी मारत म्हणाला," आई माझ्याकडून चुक झाली."
आई म्हणाली, "काय चुक झाली? प्रामाणिकपणे ती कबूल केली आणि दुरुस्त केली तर देवसुद्धा तुला माफ करेल."
राजूने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला.
आई म्हणाली," शाब्बास! तुला तुझी चूक लक्षात आली. पण, आता ती चूक दुरुस्त करायला हवी. दुकानात जाऊन दुकानदाराकडे ते पैसे वापस कर." राजू भर दुपारीच अनवाणी पायाने दुकानदाराकडे पळतच सुटला. दुकानदार एकटाच हिशोब करत बसला होता. राजूने दुकानदाराला वीस रुपयांच्या दोन नोटा परत केल्या.
"सॉरी, माझी चूक झाली. सकाळी मला तुम्ही जास्तीचे पैसे दिलेत. मला यायला उशीर झाला."
दुकानदार हसला, " माझे गणित जरा कच्चेच आहे."
त्याने राजूला शाबासकी दिली समोरच्या बरणीतील एक चॉकलेट काढून राजूला दिले.
अत्यंत प्रामाणिकपणे राजू हात सोडून पुन्हा एकदा सॉरी म्हटला. चॉकलेट न घेताच घराकडे धूम ठोकली. धापा टाकतच राजू घरात शिरला.
आईला पाहून म्हणाला," आज माझ्या आयुष्याचे गणित पक्के झाले. प्रामाणिकपणे तुझ्यासारखे आयुष्य जगेल." आईने त्याला कुशीत घेतले.. "शाब्बास.".
Comments